औपचारिक पत्र लिहिण्यासाठी टिप्स । Aupcharik Patra Writing in Marathi
मराठी भाषेत पत्र लिहिण्याचे 2 मुख्य प्रकार आहेत. हे प्रकार म्हणजे औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र! कुटुंबातील सदस्यांना किंवा कोणत्याही प्रकारे मुख्य काम नसलेल्या पत्राला अनौपचारिक पत्र म्हणून ओळखले जाते.
सरकारी कार्यालयातील एखाद्या मुख्य कामासाठी लिहिलेल्या पत्राला औपचारिक पत्र म्हणतात. शक्यतो एखादा व्यक्ती, एखादी संस्था किंवा कामकाजाच्या ठिकाणी औपचारिक पत्र लिहून माहिती कळविली जाते. अनौपचारिक पत्रात कोणत्याही प्रकारे नियम पाळण्याची गरज नसते, याउलट औपचारिक पत्रात नियम आणि एक साचेबद्धपणा पाळावा लागतो. आपल्याला औपचारिक पत्रातून काही मागणी, तक्रार करायची असेल तर आपण ती फक्त विनंती स्वरूपातच करू शकतो.
औपचारिक पत्र लिहिण्यासाठी टिप्स
भाषा स्पष्ट असावी
औपचारिक पत्र हे शक्यतो एखाद्या विनंती किंवा तक्रारी साठी असते. विनंती साठी आपण जशी सौम्य आणि स्पष्ट भाषा वापरतो त्याच प्रकारे तक्रारी साठी देखील सारखीच भाषा वापरावी. औपचारिक पत्र वाचणारा व्यक्ती तुमच्या स्पष्ट आणि संक्षिप्त पत्राला लवकर उत्तर देतो. यामध्ये कुठल्याही प्रकारे विचारपूस करणारे प्रश्न नसावेत.
पत्राची एकूणच ठेवण ही आदरपूर्व असावी
अनौपचारिक पत्रात जसे एकेरी उल्लेख आढळतात ते पूर्णपणे टाळावे. समोरचा व्यक्ती कितीही खालील दर्जाचा असेल तरी देखील त्याला आदरपूर्वक बोलावे. कुठेही लिखाणात एकेरी उल्लेख येऊ देऊ नये. एखाद्या विरोधात तक्रार करत असाल तर त्या व्यक्तीला देखील सन्मानपूर्वक वागणूक द्यायची असते.
चुका टाळा
अनेकदा आपल्याला मराठी भाषेत किंवा इंग्रजी भाषेत लिहिताना व्याकरणातील चुका साहजिकपणे होऊन जातात. होणाऱ्या चुका या साहजिकच तुम्हाला समजून येणार नाहीत परंतु समोरच्या व्यक्तीच्या त्या लक्षात आल्या तर तुमच्या पत्रातील मुख्य मुद्दा बाजूलाच राहतो. त्यामुळे मराठी व्याकरण तपासणारी साधने आता इंटरनेट वर उपलब्ध आहेत. त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता.
थोडक्यात मुद्दे मांडा
समोर असलेला व्यक्ती हा तुमची विनंती, तक्रार वाचण्यासाठी बसलेला असतो. त्यासाठी त्याला भरमसाठ गोष्टी सांगण्याची गरज नसते. त्याला जर तुमचा मुद्दा समजत असेल तर मग तो त्यापाठीमागील कारण जाणून घेण्यासाठी तुमच्याशी संपर्क करेल. पत्रातून गोष्टीचं गांभीर्य थोडक्यात समजेल अशा पद्धतीने शब्दांची मांडणी करावी.
समोरच्या व्यक्तीच्या पदवीचा मान ठेवा
प्रत्येक वेळी आपल्याला एकच पदवी घेऊन पुढे जाता येणार नाही. अनेकदा आपण यामध्ये चुका करतो. सगळीकडे फक्त माननीय किंवा सन्माननीय हेच शब्द वापरतो. मात्र याच्या पुढे त्या व्यक्तीच्या पदवीचा उल्लेख येणे महत्वाचे ठरते. उदाहरणार्थ महाविद्यालयाच्या प्राचार्य यांना पत्र लिहायचं असेल तर मग माननीय प्राचार्य, प्राध्यापकांना पत्र लिहायचं असेल तर माननीय प्राध्यापक अशा प्रकारे बदल करावे लागतील.
पुरावे जोडण्यास विसरू नका
आपल्या पत्रातील मजकुराला धरून पुरावे सादर करा. पुराव्यांच्या मदतीने तुमच्या समस्येची तीव्रता त्यांच्या लक्षात येते. पुरावे असतील तर कोणतीही गोष्ट लवकर होते.
शेवटी कृतज्ञता व्यक्त करा
समोरील व्यक्ती तुमचे पत्र वाचून तुमचे काम करणार आहे की नाही हे त्याच्या निर्णयावर अवलंबून आहे. मात्र त्यांनी कमीत कमी तुमचे पत्र वाचले आणि कदाचित त्यांच्याकडून ते काम पूर्ण होण्याची शक्यता देखील असेल त्यामुळे शेवटी त्यांचे आभार मानायला विसरू नका.
औपचारिक पत्राचा एक नमुना | Aupacharik patralekhan marathi
अभय राजपुरोहित
मु.पो. राजगुरुनगर, ता खेड
जिल्हा पुणे – 411011
दिनांक : 12 जानेवारी 2024
प्रति,
बँक मॅनेजर,
स्टेट बँक ऑफ इंडिया,
राजगुरुनगर शाखा, खेड, पुणे – 411011
विषय – मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट मिळणे बाबत
माननीय मॅनेजर महोदय,
मी अभय राजपुरोहित, आपल्या बँकेचा मागील 10 वर्षांपासून खातेधारक असून माझा खाते क्रमांक XXX-000000 आहे. डिमॅट खाते उघडण्यासाठी मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट हवे आहे.
मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट आपल्याकडून मिळावे ही नम्र विनंती.
पासबुक आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती सोबत जोडतो आहे.
आपल्या सहकार्या बद्दल आभारी आहे. धन्यवाद!
आपला विश्वासू,
अभय राजपुरोहित
FAQ
Q. औपचारिक पत्र लिहिताना कोणती भाषा वापरावी?
औपचारिक पत्र लिहीत असताना तुम्ही कोणतीही भाषा वापरू शकता फक्त ती बोलचालची भाषा नसावी.
Q. औपचारिक तक्रार पत्रातील शब्दरचना कशी असावी?
पत्र तक्रार करणारे जरी असेल तरी सौम्य पण गांभीर्य दाखविणारी भाषा औपचारिक पत्रात वापरावी.
Q. आजच्या डिजिटल युगात औपचारिक पत्र वापरले जाते का?
हो, आजही सरकारी कामे ही पत्रांवर चालतात. आपणही ईमेल च्या माध्यमांतून औपचारिक पत्र लिहीत असतो.
निष्कर्ष
औपचारिक पत्र लिहिणे तितके अवघड नाही मात्र ही देखील एक कला आहे. आज ऑफिस मध्ये देखील त्याचसाठी ईमेल कसा लिहावा हे शिकविले जाते. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये तुम्हाला परीक्षेत औपचारिक पत्र लिहायला सांगितले जातात. कारण यातून आपल्याला शब्दांवर नियंत्रण आणि आपली भाषा शैली यांची जाणीव होते.
मुख्यतः सांगायचं असेल तर औपचारिक पत्र लिहिण्याची कला ज्याच्याकडे असते त्याला आपले विचार थोडक्यात मांडता येतात. तुमचे वाचन चांगले असेल तरच हे सर्व शक्य आहे.
हे देखील वाचा